पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: शिरूर (Shirur News) तालुक्यातील निमगाव भोगी (Nimgaon Bhogi News) या गावातील शेतजमीन व शिवारात, रांजणगाव एमआयडीसीतील महाराष्ट्र इन्व्हायरो पॉवर लि.( Maharashtra Enviro Power Ltd.) या कंपनीचे सांडपाणी पुन्हा सोडण्यात येत असल्याने केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे नागरिक व जनावरांचे आरोग्य पूर्णतः धोक्यात आले आहे.
रांजणगाव एमआयडीसीतील या कंपनीकडून निमगाच्या हद्दीत वारंवार सोडण्यात येणारे पाणी कायमस्वरूपी बंद करण्याची व वाढीव 53 एकर शेती क्षेत्र रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांसह स्थानिक नागरिकांनी माजी केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार पवार यांनी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी आमदार ॲड. आशोक पवार यांनी निमगाव येथील तलाव, शेतजमीन व केमिकलयुक्त दूषित पाणी याची 13 मे रोजी पाहणी करुन या संदर्भात अवघ्या 15 दिवस ते महिनाभरात मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक लावण्याचे आश्वासन पवार यांच्या समोर दिले.
परंतू आता पाच महिने उलटून गेले तरी याबाबत कोणताही ठोस उपाय योजना होऊ शकली नसल्याने आणि त्यातच पुन्हा संबंधित कंपनीकडून केमिकल युक्त पाणी सोडले जात असल्यामुळे ग्रामस्थांसह स्थानिक नागरिकांनी पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, कंपनीच्या या दूषित पाण्यामुळे गाय, शेळी व पोल्ट्रीफार्म मधील कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. गावातील प्रगतिशील शेतकरी अशोक दामू पावशे यांच्या पोल्ट्री फार्म मधील 100 ते 150 कोंबड्यांची पिल्ले मृत्यूमुखी पडली आहेत. या मृत पिलांची पाहणी मलठणचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल सूर्यवंशी यांनी पंचनामा केला आहे. मृत पिल्ले व दूषित पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी निमगावचे माजी उपसरपंच लक्ष्मण सांबारे, माजी सरपंच अंकुश इचके, सुप्रिया पावशे, विठ्ठल पावशे, सामाजिक कार्यकर्ते बाबा इचके, संदीप पावशे, अविनाश पावशे, शेतकरी अशोक पावशे व ग्रामस्थ उपस्थित होते.







