पुणे : हाताच्या फ्रॅक्चरवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या 28 वर्षीय विवाहित महिलेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिरूरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालयातील उपचार पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पूजा राहुल गई असे मृत महिलेचे नाव आहे.

पूजा या 4 ऑगस्ट रोजी दुचाकीवरून जात असताना पडल्या होत्या. या अपघातात त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना शिरूर शहरातील बाबुरानगर परिसरातील कोळपे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तपासणीनंतर हाताला फ्रॅक्चर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.

6 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 11 वाजता पूजांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असताना बराच वेळ उलटूनही डॉक्टर बाहेर न आल्याने नातेवाईकांमध्ये चिंता वाढली. पती राहुल गई यांनी ऑपरेशन थिएटरचा दरवाजा ठोठावून आत काय सुरू आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना आतून प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.

सुमारे 3 तासांनंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि पूजांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल केलेल्या महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पूजांचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळेच पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पतीने केला आहे. वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोष आढळल्यास संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.








