Pune Unseasonal Rain : पुणे : राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात बुधवारी अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे ज्वारीसह इतर पिकांवर परिणाम झाला असून शेतकरी अडचणीत आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव परिसरात कापणीच्या तोंडाशी आलेली पिके पावसामुळे आडवी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गुढी पाडव्याच्या सणाआधीच आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मोठ्या अपेक्षेने घेतलेले पीक वाया गेल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान, धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रविण स्वामी यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. मंगळवारी झालेल्या वादळी वारे, पाऊस आणि गारपीट यामुळे अनेक भागांत शेतीचे नुकसान झाले आहे.
पुणे-कोल्हापूर महामार्ग परिसर आणि आंबेगाव तालुक्यातही पावसाच्या सरी पडल्या. डिंभे धरण परिसरात दुपारनंतर वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला होता. सध्या हलका पाऊस पडत असला तरी पुढील काळात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, केळी, आंबा तसेच कांदा, हरभरा, गहू आणि ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी उभी पिके जमिनीवर पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे.
दरम्यान, कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल राज्य सरकारने घेतली आहे. नुकसानभरपाईबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.







