Pune : पुणेकरांसाठी एलपीजी गॅसचा पुरवठा आता अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होणार आहे. जागतिक राजकीय परिस्थितीमुळे विशेषतः इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणि सध्या सुरु असलेले युद्ध जागतिक इंधन पुरवठा बाधित झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या तुटवड्यामुळे एलपीजी गॅसची कमतरता निर्माण झाली, आणि काही नागरिकांनी साठेबाजी करणे सुरू केले. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय घेऊन ग्राहकांसाठी नियम स्पष्ट केले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली गॅस वितरण व्यवस्था सुधारण्यात आली आहे. आता घरगुती ग्राहकांना गॅस बुकिंग केल्यावर सिलेंडर थेट घरपोच मिळेल, त्यामुळे रांगा लावण्याची गरज नाही. नवीन नियमांनुसार, ग्राहकांनी OTP प्रणालीद्वारे गॅस बुकिंग केल्यावर पुढील 96 तासांत सिलेंडर घरपोच मिळणे अनिवार्य राहणार आहे. या बदलामुळे ग्राहकांना सुविधाजनक आणि सुरक्षीत वितरण सुनिश्चित केले जाणार आहे.
साठेबाजी टाळण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहकाने एक सिलेंडर घेतल्यानंतर पुढील बुकिंगसाठी किमान 25 दिवस प्रतीक्षा करावी लागेल. यामुळे अतिरिक्त सिलेंडरचा गैरफायदा घेण्याची शक्यता कमी होणार आहे. तसेच, फक्त अधिकृत गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध असेल, ज्यामुळे विनाकारण रांगा लावणाऱ्यांवर नियंत्रण मिळेल.
पुणेकरांसाठी ही सुधारित प्रणाली केवळ गॅस पुरवठ्याचा प्रश्न सोडविणार नाही, तर शहरातील भीतीचे वातावरण आणि काळाबाजार टाळण्यासही मदत करेल. जागतिक तेल पुरवठ्यातील अस्थिरतेमुळे घरगुती गरजा सुरक्षित राखणे महत्त्वाचे ठरते, आणि पुणे प्रशासनाने यासाठी त्वरित आणि परिणामकारक पावलं उचलली आहेत. ग्राहकांनी आता नियम पाळून बुकिंग करणे आणि अतिरिक्त साठेबाजी टाळणे आवश्यक आहे, ज्यामुळे शहरातील सर्व नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत मिळू शकेल.







