लोणीकंद, ता. 19 : दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन इसमांनी भररस्त्यात सराफा व्यावसायिकाला अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग हिसकावून पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली. रविवारी (ता. 08) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पेरणे गावातील ‘ड्रिम व्हिला’ सोसायटी परिसरात ही घटना घडली आहे.

सचिन मनोहर धर्माधिकारी (वय 36 वर्षे, धंदा-व्यवसाय, रा. डोंगरगाव, ता. हवेली) असे व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात तिघांच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन धर्माधिकारी यांचे कोरेगाव भिमा येथे सोन्या-चांदीचे दुकान आहे. रविवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते आपल्या 17 वर्षीय पुतण्यासह दुचाकीवरून (MH 12 BY 6857) घराकडे निघाले होते. त्यांच्याकडे दिवसभराचा गल्ला आणि दुकानाच्या चाव्या असलेली बॅग होती.
साडेआठ वाजण्याच्या सुमारास पेरणे गावातील ‘ड्रिम व्हिला’ सोसायटीच्या पुढे काही अंतरावर गेले असता, पाठीमागून एका काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून अज्ञात तीन तरुण आले. चालकाने हेल्मेट घातले होते, तर पाठीमागे बसलेल्या दोघांनी हुडी आणि तोंडावर मास्क लावले होते. त्यांनी धर्माधिकारी यांची गाडी अडवून त्यांना जोराचा धक्का दिला. यामध्ये काका-पुतण्या दोघेही रस्त्यावर पडले.
दोघेही खाली पडल्याची संधी साधून आरोपींनी पुतण्याच्या हातातील हिरव्या रंगाची लेदर बॅग हिसकावून घेतली. या बॅगेत 60 हजार रुपयांची रोख रक्कम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्वेलरी दुकानाच्या व तिजोरीच्या चाव्या होत्या. लूट केल्यानंतर आरोपींनी पेरणे गावाच्या दिशेने सुसाट वेगाने पळ काढला.
दरम्यान, लोणीकंद पोलिसांनी परिसरात पेट्रोलिंग करून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. सचिन धर्माधिकारी यांनी दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी अज्ञात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.







