पुणे: श्रीक्षेत्र आळंदी येथे कार्तिकी वारीमुळे पुणे शहरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी या बदलांविषयी माहिती दिली असून हे नियम 21 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी चुकून गेलात तर वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता आहे.

वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय
कार्तिकी वारीलाही हजारो वारकरी आळंदीला दर्शनासाठी येतात. यामुळे परिसरात प्रचंड गर्दी होते आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वाढते. दरम्यान, विविध मार्गांवर वाहतूक बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जड वाहनांवर बंदी :
विश्रांतवाडीहून बोपखेल फाट्याद्वारे आळंदीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग :
विश्रांतवाडीकडून येणाऱ्या वाहनांनी येरवडा, खडकी येथील होळकर पुल, जुन्या मुंबई–पुणे या पर्यायी मार्गांचा वापर करावा.
नगर रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांनी शिक्रापूरमार्गे चाकणकडे जावे आणि तेथून पुढे आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचावे. नगर रस्त्यावरून तुळापूर फाटा मार्गे आळंदी–मरकळकडे जाणाऱ्या जड वाहनांनाही पर्यायी मार्गांचा वापर करावा.
या वाहतूक बदलांमुळे आळंदीच्या मुख्य रस्त्यांवरील वर्दळ निश्चितच कमी होईल. परिणामी, वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि कोणताही अडथळा न येता पूर्ण होईल. त्यामुळे, सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करून पोलिसांना मदत करावी.






