पुणे: फुरसुंगी पोलिसांनी (Pune News) एका साध्या दुचाकी चोरीचा तपास करताना एका मोठ्या गुन्हेगारी साखळीचा पर्दाफाश केला आहे. संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या कबुलीने पोलीसही चक्रावून गेले. दुचाकी चोरणाऱ्या या मुलांनी परिसरात चक्क घरफोड्यांचा धडाका लावल्याचे समोर आले आहे.

अमोल कुंभार यांची ‘होंडा शाईन’ दुचाकी चोरीला गेली आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. तपास सुरू असतानाच पोलिसांना खबर मिळाली की, फुरसुंगी रेल्वे पुलाखालील पॉवर हाऊस परिसरात दोन मुले एका काळ्या रंगाच्या दुचाकीसह फिरत आहेत. पोलिसांनी वेळ न घालवता तिथे सापळा रचला आणि दोन्ही मुलांना ताब्यात घेतले.
सुरुवातीला ही मुले पोलिसांना गुंगारा देत होती, मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच संपूर्ण माहिती सांगितली. धक्कादायक बाब म्हणजे, चोरलेल्या दुचाकींचा वापर करून त्यांनी परिसरात दोन ठिकाणी घरफोड्याही केल्या होत्या. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 दुचाकी, 1 मोबाईल, रोकड आणि महागडे कपडे असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास सुरु आहे.







