Pune News: थेऊर, ता. 06 : नव्या वर्षातील 2026 मधील पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी असल्याने अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणी मंदिरात भाविकांनी मंगळवारी (ता. 06) मोठ्या प्रमाणात पहाटेपासूनच गर्दी केली होती.

पौष महिन्यातील अंगारकी चतुर्थीचा योग आहे. अंगारकी चतुर्थी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात चिंतामणीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. पहाटे पुजारी महेश आगलावे यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थानच्या वतीने चिंतामणीची महापूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते. देवस्थान तर्फे मंदिर प्रांगण आणि मंदिराबाहेर मांडव घालण्यात आले होते, दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली.
चिंतामणी गणपती मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कोकम, विविध प्रकारचे पेरू, तसेच नारळ, दुर्वा विकण्यासाठी महिला विक्रेत्या व नागरिक बसले होते. यावेळी येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करताना दिसून येत होते. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, हार, फुल, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले आदी विक्रेते दिसून येत होते. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांसह विक्रेत्यांची मोठी वर्दळ पहायला मिळत होती.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि आगलावे बंधूंच्या वतीने मंदिर प्रांगणात मंडप घालण्यात आला होता. देवस्थानच्या वतीने मंदिराबाहेर दर्शन बारी बांधण्यात आली होती तसेच त्यावर छत टाकण्यात आला होता. मंदिरात फुलांची आरास, डेकोरेशन करण्यात आले होते. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने ह.भ.प.देठे महाराज शास्त्री, पैठण यांचे सुभाष्य कीर्तन झाले. चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघला त्यांनतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला.
दरम्यान, जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात केली होती. ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थानचे विश्वस्त केशव विद्वांस लक्ष ठेवून होते.






