अमित मुंडीक

पुणे: पुणे (Pune News) स्टेशन परिसरातील वाहतूक समस्या आणि नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन, महापालिका प्रशासनाने ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काल पुणे स्टेशन पार्सल गेट परिसरात अतिक्रमणांविरोधात मोठी मोहीम राबवली. या कारवाईत अटी व शर्तींचा भंग करणाऱ्या तसेच अतिक्रमण केलेल्या व्यवसायधारकांवर कठोर कारवाई करत एकूण 29 वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
संयुक्त पथकाकडून धडक कारवाई
महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणाखालील अतिक्रमण विभागाने वाहतूक विभाग आणि पोलिसांना सोबत घेऊन ही कारवाई केली. यावेळी वाहतूक विभाग परिमंडळ क्र. 04 चे पोलीस उप आयुक्त, बंड गार्डन वाहतूक पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक, तसेच पुणे मनपाचे कार्यकारी अभियंता (पथ विभाग) आणि अतिक्रमण विभाग उपस्थित होते. कारवाईत अतिरिक्त जागेचा वापर करणारे आणि अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले.
कारवाईसाठी मोठी यंत्रणा
या धडक कारवाईसाठी मनपा प्रशासनाने २ ट्रक, अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, तसेच पोलीस आणि MSF जवान यांची मोठी टिम तैनात केली होती. परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवून आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता ही कारवाई शांततेत पार पडली. एकूण २९ वस्तू जप्त करण्यात आल्यामुळे परिसरात तात्काळ मोकळी जागा दिसू लागली.
कारवाई नियमित सुरू राहणार
मनपाच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उप आयुक्त यांनी यावेळी स्पष्ट केले की, “शहरातील मुख्य भागांपैकी एक असलेल्या पुणे स्टेशन पार्सल गेट परिसरातील ही कारवाई यापुढेही नियमित आणि प्रभावीपणे सुरू राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.” नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.







