पुणे: पुणे (Pune News) शहराच्या सिंहगड रस्ता परिसरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. वडगाव बुद्रुक येथे सोमवारी दुपारी भरदिवसा एका 22 वर्षीय तरुणाचा क्रूरपणे खून करण्यात आला. या घटनेने शहरातील वाढत्या हिंसक गुन्ह्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

धनकवडी येथील तौकीर शेख (22) हा ‘कृष्णकुंज’ या इमारतीच्या पार्किंगमध्ये एकटा बसला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, यावेळी अचानक 5 तरुणांचा एक गट तिथे आला. कोणताही वाद नसताना या गटाने तौकीरवर कोयत्याने सपासप वार करायला सुरुवात केली. तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. क्रौर्याची हद्द गाठत हल्लेखोरांनी त्यानंतर कुंडीने ठेचून त्याची जागीच हत्या केली. हा हल्ला करून आरोपी लगेच पळून गेले.
टोळीयुद्ध आणि पूर्ववैमनस्य?
सिंहगड रोड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तौकीर शेखचे पूर्ववैमनस्य होते का किंवा हा हल्ला टोळीयुद्धातून झाला आहे का, याची चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे, हल्लेखोरांपैकी 2 जण अल्पवयीन असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपींच्या शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके नेमली आहेत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हा हल्ला नियोजित होता, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुणे शहरातील अल्पवयीन तरुणांमध्ये स्थानिक वर्चस्वाचे वाद आणि नशेच्या व्यसनामुळे हिंसक घटना वाढत असल्याने चित्र स्पष्ट दिसत असून अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन गुन्ह्यात सामील असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या खुनामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.






