पुणे: पुण्यातील (Pune News) रस्त्यांवर आता वाहतूक नियम मोडणे महागात पडणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी वाहतूक शिस्तीच्या अंमलबजावणीसाठी मोठे आणि कठोर निर्णय घेतले आहेत.

शहरात नियम तोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दंड आकारला जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर एखाद्या वाहनचालकाने 3 पेक्षा जास्त वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास, त्याचा वाहनचालन परवाना नियमानुसार तत्काळ रद्द केला जाईल. यानंतरही जर त्यांनी नियम तोडणे सुरू ठेवले, तर त्यांचे वाहन जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी विधानभवनात आयोजित बैठकीत यांनी ही माहिती दिली आहे.
डॉ. पुलकुंडवार यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांवर आता मोठी जबाबदारी सोपवली आहे. रस्ते सुस्थितीत ठेवणे ही संबंधित विभागांची जबाबदारी आहे आणि जर रस्ते खराब असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी अशा यंत्रणावर कारवाई करावी असे सांगण्यात आले आहे.
रस्ते सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दरमहा बैठक घेऊन, मागील बैठकांमध्ये ठरवलेली कामे पूर्ण झाली आहेत की नाहीत, याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या बैठकीत पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.






