पुणे: पुणे (Pune News) जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले राजगडावर निसर्गाच्या नियमांचे पालन न करणे पर्यटकांच्या जीवावर बेतले आहे. शनिवारी 20 डिसेंबर रोजी किल्ल्यावरील सुवेळा माची परिसरात मधमाशांनी अचानक भीषण हल्ला केला. या हल्ल्यामध्ये जवळपास 20 ते 25 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 90 दिवसांतील ही 5 वी घटना असून आतापर्यंत 200 हून अधिक पर्यटकांना मधमाशांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. कराड आणि मुंबई येथून पर्यटनासाठी आलेले गट या दुर्घटनेचे बळी ठरले आहेत.

या हल्ल्यामागील कारण अत्यंत धक्कादायक आहे. सुवेळा माचीवर फिरत असताना एका महिला पर्यटकाने वापरलेल्या परफ्यूमचा तीव्र वास हवेत पसरला. या सुगंधी द्रव्यामुळे मधमाशा चवताळल्या आणि त्यांनी पर्यटकांच्या समूहावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पर्यटकांची मोठी पळापळ झाली होती. जीव वाचवण्यासाठी पर्यटक सैरावैरा पळू लागले होते. या गोंधळात मधमाशांच्या डंखांमुळे काही पर्यटक जागेवरच बेशुद्ध पडल्याने गडावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.
गंभीर जखमी असलेल्या 8 पर्यटकांना तातडीने वेल्हे आणि नसरापूर येथील दवाखान्यात नेण्यात आले असून त्यांच्यावर वेल्हे येथे उपचार सुरू आहेत. गडावर सुगंधी अत्तर वापरू नये अशा सूचना देऊनही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता पायथ्यालाच पर्यटकांची तपासणी करण्याची मागणी होत आहे.







