तळेगाव, ता. 09 : ‘तुम्ही माझ्या आईला उपसरपंचपदाच्या निवडणुकीत का पाडले?’ असे म्हणत हॉटेल व्यावसायिकावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. गुरुवारी पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कामशेत (ता. मावळ) परिसरात हि घटना घडली.

नीलेश मोहन दाभाडे (वय-44, रा. कामशेत, ता. मावळ) असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर ऋषिकेश सुरेश शिंदे (रा. भैरवनाथ मंदिराजवळ, कामशेत) असे मारहाण केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दाभाडे यांनी कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित फरार आहे.
कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत ग्रामपंचायतीची नुकतीच उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली होती. फिर्यादी नीलेश दाभाडे गुरुवारी पहाटे घरासमोर उभे असताना संशयित आरोपी ऋषिकेश शिंदे पहाटे दुचाकीवरून तेथे आला.
यावेळी आरोपीच्या हातात लोखंडी, धारदार कोयता होता. यावेळी त्याने उपसरपंचपदाच्या निवडणुकीतील राजकीय वादातून ‘माझ्या आईला उपसरपंचपदाच्या निवडणुकीत का पाडले’, असा जाब विचारत नीलेश दाभाडे यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केले.
पुढील तपास पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील पोवार हे तपास करीत आहेत.







