Pune Crime: पुणे : खेड तालुक्यात अन्न आणि औषधे विभागाचा निरीक्षक असल्याचे भासवून मेडिकल दुकानाची तपासणी करत वीस हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया निरीक्षकाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे राजगुरुनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. आकाश कोंडुसकर असे या आरोपीचे नाव असून त्याचे मूळ नाव आनंद गौतम भुजंग वय 34, रा. सांगवी, पुणे असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा- Jejuri News: जेजुरीत भंडाऱ्याच्या नावाखाली रसायनांचा खेळ? भीषण दुर्घटनेनंतर आता मोठी कारवाई
राजगुरुनगर येथील भवानी मेडिकलमध्ये ही घटना घडली. एक व्यक्ती मेडिकलमध्ये आला आणि आपण अन्न व औषधे विभागाचा वरिष्ठ निरीक्षक असल्याचे सांगू लागला. त्याने औषध साठा, नोंदी आणि इतर बाबींची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान काही नसलेले दोष दाखवून मेडिकल चालकाकडे वीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
संशय आल्याने मेडिकल चालक तरुण चौधरी यांनी त्या व्यक्तीकडे ओळखपत्राची मागणी केली. ओळखपत्र पाहिल्यानंतर त्यावरील नाव नेहमी येणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा वेगळे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बाजूला जाऊन अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधला. चौकशीत अशा नावाचा कोणताही अधिकारी विभागात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले.
अन्न व औषध प्रशासनाकडून त्या व्यक्तीला थांबवून ठेवण्यास सांगण्यात आले. मात्र संशय वाढताच तोतया निरीक्षक नाष्टा करून येतो असे सांगून तेथून निसटला. मेडिकल चालक व इतरांनी तो ज्या मार्गाने गेला त्या दिशेने त्याचा पाठलाग केला. एका सीएनजी पंपावर तो आपल्या वॅगनआर गाडीला गॅस भरत असल्याचे दिसून आले.
तेथे मेडिकल संघटनेच्या सदस्यांनी त्याला घेरले आणि प्रश्न विचारले. आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. अखेर त्याला खेड पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी तोतयागिरी करून फसवणूक केल्याप्रकरणी आकाश कोंडुसकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.






