पुणे: महाराष्ट्र पोलीस दलात सुरू (Police Recruitment) असलेल्या 15294 पदांच्या ऑनलाइन भरती प्रक्रियेत अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. अनाथांसाठी असलेल्या 1 टक्के आरक्षणामध्ये कोणत्या प्रवर्गाला किती जागा मिळणार, हे स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, बॅन्डस्मन (Bandsman) आणि अनाथ या दोन्ही घटकांच्या जागांच्या वाटपात सामाजिक आरक्षणानुसार स्पष्टता नसल्यामुळे उमेदवारांमध्ये मोठी नाराजी असून या प्रशासकीय आणि तांत्रिक त्रुटीमुळे अर्ज भरताना उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दरवर्षी अंतिम निकालानंतर सामाजिक प्रवर्गातील जागा कमी करून त्या अनाथांना दिल्या जातात. यामुळे, ज्या प्रवर्गाचे नुकसान होते, त्या उमेदवारांवर सरळसरळ अन्याय होतो. अनाथांना जागा देण्यापूर्वीच जाहिरातीत त्याची स्पष्ट माहिती देणे आवश्यक असल्याचे उमेदवारांनी सांगितले आहे.
या भरती प्रक्रियेतील सर्वात मोठी अडचण ही वयोमर्यादेतील तांत्रिक त्रुटी आहे. जाहिरातीनुसार, 30 नोव्हेंबर पर्यंत 18 वर्षे पूर्ण होणारे सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात. मात्र, प्रत्यक्षात अर्ज भरताना ज्या उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2015 पर्यंत 18 पूर्ण झाले आहे, फक्त त्यांचेच अर्ज स्वीकारले जात आहेत.
बॅन्डस्मन पदासाठी राज्यातील एकूण सात घटकांमध्ये जागा जाहीर झाल्या आहेत. यापैकी पुणे शहर, सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, वाशीम आणि गोंदिया या पाच जिल्ह्यांत सामाजिक आरक्षणानुसार प्रवर्गनिहाय जागांचा तपशील दिलेला नाही. थोडक्यात, 15294 पदांच्या या मोठ्या पोलीस भरती प्रक्रियेत आरक्षण वाटप आणि वयोमर्यादेतील तांत्रिक त्रुटींमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.







