मुंबई: गुन्हेगारी प्रकरणे उघड करणाऱ्या मुंबई पोलीस दलातच आता एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार समोर आला आहे. पोलीस दलात कामावर नसलेल्या काही व्यक्तींना बनावट पद्धतीने पोलीस कर्मचारी दाखवून त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा पगार काढण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणात तब्बल 6.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या कथित वेतन घोटाळ्याप्रकरणी मंत्रालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. उत्तर प्रादेशिक विभागातील पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीनंतर समतानगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती जुन्या ‘सेवार्थ’ प्रणालीतून नवीन वेतन प्रणालीमध्ये स्थलांतरित करताना समोर आला. संशयास्पद नोंदी आढळल्यानंतर या प्रकरणाचे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले. या तपासणीमध्ये 2019 आणि 2020 या कालावधीतील काही महिन्यांच्या वेतन रकमांमध्ये मोठी तफावत आढळून आली.
मुंबई पोलीस दलातील प्रत्येक विभागीय कार्यालयातून कर्मचाऱ्यांचे वेतन तयार केले जाते. यासाठी उपस्थिती, कामाचे दिवस आणि इतर माहिती तयार करून ती मंजुरीसाठी पाठवली जाते. याच प्रक्रियेतील त्रुटींचा फायदा घेत काही अधिकाऱ्यांनी पोलीस दलाशी कोणताही संबंध नसलेल्या 8 ते 10 व्यक्तींची नावे वेतन यादीत समाविष्ट केल्याचा आरोप आहे.
एफआयआरनुसार, काही बनावट नावांवर दरमहा पगाराची रक्कम जमा केली जात होती. या व्यक्ती कोण आहेत, त्यांच्या बँक खात्यांचा वापर कोण करत होते आणि या पैशांचा लाभ कोणाला मिळाला याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणात रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण, अजय राठोड आणि अमोल मेश्राम या तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सरकारी फसवणूक, पुरावे नष्ट करणे यासारखी गंभीर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.






