नवी दिल्ली: अन्न सुरक्षा नियामक संस्था FSSAI ने काही प्रसिद्ध मद्य ब्रँडच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तपासणीदरम्यान काही उत्पादनांमध्ये नियमांनुसार मान्यता नसलेले कृत्रिम फ्लेवर आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. FSSAI ने कारवाई केलेली ही उत्पादने भारतात तयार केली जात असल्याने त्यांची किंमत कमी असते. दरम्यान, अनेकांना या निर्णयामुळे धक्का बसला आहे.

FSSAI च्या माहितीनुसार, काही कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये दारूसारखी चव आणि सुगंध निर्माण करण्यासाठी कृत्रिम किंवा नैसर्गिक फ्लेवरसारख्या घटकांचा वापर करण्यात आला होता. मात्र, अन्न सुरक्षा नियमांनुसार अशा प्रकारच्या फ्लेवरचा वापर करण्यास परवानगी नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

या कारवाईमध्ये डियाजियो इंडियाच्या युनायटेड स्पिरिट्स, इनब्रू बेवरेजेज आणि मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर या कंपन्यांच्या काही उत्पादनांचा समावेश आहे. FSSAI ने मध्य प्रदेशातील युनायटेड स्पिरिट्सच्या एंटीक्विटी ब्लू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या काही प्रकारांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
याशिवाय इनब्रू बेवरेजेजच्या बॅगपाइपर डीलक्स व्हिस्की आणि ओल्ड कास्क डीलक्स XXX रमच्या विक्रीलाही मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर कंपनीच्या ओल्ड मोंक रमच्या तीन प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे.
FSSAI च्या प्रयोगशाळेतील तपासणीत काही उत्पादनांमध्ये अशा फ्लेवरिंग पदार्थांचा वापर आढळला, ज्यामुळे त्या पेयांना विशिष्ट चव आणि कृत्रिम सुगंध देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, भारतीय नियमांनुसार मद्यपेयांमध्ये अशा प्रकारे कृत्रिम फ्लेवर मिसळण्यास परवानगी नसल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील तपास आणि नियामक कारवाई सुरू आहे.







