नालासोपारा: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या द्वितीय कन्या शकुंतला अजित सपताल यांचे निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दीर्घ आजाराशी झुंज देताना 2 ऑगस्ट रोजी पहाटे 2.45 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

शकुंतला सपताल या काही काळापासून नालासोपारा येथे मुलगा प्रशांत यांच्या घरी राहत होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू होते. अखेर आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. 3 ऑगस्ट रोजी नालासोपारा येथे मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात संजय, राजेश आणि प्रशांत हे मुलं, मुलगी नंदिनी तसेच नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा विवाह इस्लामपूर येथील शिक्षित तरुण अजित सपताल यांच्यासोबत स्वतः अण्णा भाऊ साठे यांनी करून दिला होता.
शकुंतलाबाई यांचा लहानपणापासूनच सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींशी संबंध होता. त्या कम्युनिस्ट पक्षाच्या बाल संघात आणि सांस्कृतिक कला पथकात सक्रिय होत्या. आपल्या आई कॉ. जयवंताबाई साठे यांच्यासोबत पक्षाच्या मुखपत्रांच्या विक्रीमध्येही त्या सहभागी होत असत.
अण्णा भाऊ साठे यांच्या अनेक कथा आणि कादंबऱ्यांच्या त्या पहिल्या वाचक होत्या. अण्णा भाऊंचे हस्ताक्षर समजण्यास अवघड असल्याने लेखनातील चुका आणि सुधारणा करण्यात त्या मदत करत असत. साहित्याची आवड असलेल्या शकुंतलाबाईंनी अण्णा भाऊंच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींवर आधारित लेखही लिहिले होते. दरम्यान, अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.






