लोणी काळभोर, ता. ५ : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी प्रदीप पवार यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांच्या आगमनामुळे नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. गेल्या काही वर्षांत वाढलेली गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, टोळीयुद्धे, महिलांवरील अत्याचार आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न पाहता, आता “डॅशिंग” म्हणून ओळख असलेल्या प्रदीप पवार यांच्या कामगिरीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

दीड वर्षांहून अधिक काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची नुकतीच बदली झाली. त्यांच्या जागी आलेल्या प्रदीप पवार यांच्याकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे, पंधरा वर्षांपूर्वी लोणी काळभोरमध्ये कार्यरत असलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक सुहास गरुड यांच्या धडाकेबाज कारभाराची आठवण आजही नागरिकांच्या मनात कायम आहे.
‘सज्जनांचा पुरस्कार, दुर्जनांवर कायदेशीर वार’ची परंपरा पुढे नेणार का?
सन २०१० ते २०१३ या कालावधीत सुहास गरुड यांनी लोणी काळभोरमध्ये कार्यरत असताना “सज्जनांचा पुरस्कार, दुर्जनांवर कायदेशीर वार” हे धोरण राबवले होते. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांवर पोलिसांचा जबरदस्त वचक निर्माण झाला होता. त्यामुळे किरकोळ वाद, हाणामाऱ्या, दहशत आणि अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर आळा बसला होता. आजही अनेक नागरिक प्रत्येक नव्या अधिकाऱ्याची तुलना सुहास गरुड यांच्या कार्यपद्धतीशी करतात. मात्र गेल्या १५ वर्षांत एकाही अधिकाऱ्याला तसा ठसा उमटवता आला नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
गुन्हेगारी, अवैध व्यवसाय आणि कायदा-सुव्यवस्थेचे मोठे आव्हान
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही वर्षांत खून, दरोडे, टोळी संघर्ष, जबरी चोरी, महिलांवरील अत्याचार, शालेय विद्यार्थिनींची छेडछाड, पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार, तलवारीने केक कापणे, तलवारबाजीचे व्हिडिओ, मटका, गावठी दारू, गुटखा विक्री आणि अवैध प्रवासी वाहतूक अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. कवडीपाट, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, थेऊर फाटा, रायवाडी, राहिंजवस्ती, माळीमळा, स्टार सिटी, आळंदी म्हातोबा परिसर आणि इतर भागांमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न वारंवार समोर आले आहेत. त्यामुळे पोलिसांचा वचक पुन्हा निर्माण करण्यासाठी कठोर आणि धाडसी नेतृत्वाची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.
तरुणाईसमोरील वाढती आव्हाने
हवेली तालुक्यातील झपाट्याने होणारे नागरीकरण, वाढलेली आर्थिक उलाढाल आणि बदलती जीवनशैली यामुळे तरुणांमध्ये सोशल मीडिया, दिखाऊपणा, व्यसनाधीनता आणि बेफिकीर वर्तन वाढल्याचे चित्र आहे. परिणामी अनेकदा किरकोळ कारणांवरून गंभीर गुन्हे घडत आहेत. अशा परिस्थितीत केवळ गुन्हेगारांवर कारवाईच नव्हे, तर समाजाभिमुख पोलीसिंग आणि तरुणांमध्ये कायद्याबाबत जागृती निर्माण करण्याचे मोठे आव्हानही पवार यांच्यासमोर असणार आहे.
‘आले आणि गेले’ की ‘ठसा उमटवला’?
लोणी काळभोरसारख्या संवेदनशील पोलीस ठाण्यात यापूर्वी अनेक अधिकारी आले आणि गेले. मात्र नागरिकांच्या स्मरणात कायम राहिले ते सुहास गरुड यांचे नाव. आता नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार हे आपल्या कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करणार की केवळ बदली होऊन जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत आणखी एक नाव ठरणार, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. “साहेब, लोणी काळभोरला पुन्हा एकदा कडक, धडाकेबाज आणि लोकाभिमुख पोलीसिंगची गरज आहे. आपल्या डॅशिंग कामाचा जलवा दिसणार का?” असा सवाल सध्या परिसरातील नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.






