पुणे: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोनवडी येथे असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) मुलांच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

मृत विद्यार्थ्याचे नाव सौरभ संतोष साखरे (वय 23) असे असून तो आयटीआयच्या वसतिगृहात राहत होता. उन्हाळ्यामुळे रात्री उष्णता वाढल्याने सौरभ हा वसतिगृहाच्या टेरेसवर झोपला होता. याच ठिकाणी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी ऋषिकेश लक्ष्मण बढेकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारीनुसार, अमय भिका कोकरे (वय 19) याने जुन्या वादातून आणि अनिरुद्ध साखरे याच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 4 जूनच्या रात्रीपासून 5 जूनच्या पहाटेदरम्यान ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने लोखंडी पाईप तसेच सिमेंटच्या गट्ट्याचा वापर करून सौरभच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाला सुरुवात केली.
या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात आरोपी अमय कोकरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये कारवाई सुरू केली असून घटनेमागील नेमके कारण आणि वादाचे स्वरूप काय होते याचा तपास केला जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून या घटनेमुळे आयटीआय परिसरासह संपूर्ण आंबेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.






