पुणे : हवेली तालुका पंचायत समितीची आगामी मासिक सभा यावेळी नेहमीच्या सभागृहात नव्हे, तर ऐतिहासिक किल्ले सिंहगडावर होणार आहे. पंचायत समितीच्या या वेगळ्या उपक्रमाला जिल्हा परिषद प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे सिंहगडावर तालुक्यातील विविध विकासकामे आणि ग्रामीण भागातील समस्यांवर चर्चा होणार आहे.

पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे आणि गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सिंहगडावर सभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
साधारणपणे पंचायत समितीच्या मासिक बैठका मुख्यालयातील सभागृहात घेतल्या जातात. या बैठकांमध्ये गावांमधील विकासकामे, सरकारी योजनांची अंमलबजावणी, नागरिकांच्या अडचणी आणि विविध प्रशासकीय विषयांवर चर्चा होते. मात्र, पंचायत समितीचे कामकाज केवळ कार्यालयापुरते मर्यादित न राहता तालुक्यातील वेगवेगळ्या भागांशी जोडले जावे, अशी भूमिका सभापती युवराज काकडे यांनी मांडली होती. त्यातूनच वर्षातील एखादी सभा तालुक्यातील वेगळ्या ठिकाणी घेण्याची कल्पना पुढे आली.

यासाठी हवेली तालुक्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या घेरा सिंहगडाची निवड करण्यात आली. मुख्यालयाबाहेर सभा घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची परवानगी आवश्यक होती. त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला आणि त्याला मंजुरी मिळाली.
या बैठकीत पश्चिम हवेलीतील गावांचे प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, प्रलंबित विकासकामे आणि सिंहगड परिसरातील पर्यटन सुविधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक स्थळीच स्थानिक प्रश्न मांडले जाणार असल्याने संबंधित कामांना गती मिळेल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.
या सभेत कोणते निर्णय घेतले जातात आणि पश्चिम हवेलीच्या विकासासाठी कोणत्या उपाययोजना सुचवल्या जातात, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






