पुणे : अंधश्रद्धेचा आधार घेत एका अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेतल्याचा गंभीर प्रकार पुण्यात समोर आला आहे. स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणून ओळख देणाऱ्या एका व्यक्तीवर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

स्वप्नील लांडे असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असल्याची माहिती आहे. तो पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. दैवी शक्ती आणि चमत्कारांचा दावा करत संबंधित व्यक्तीने काही लोकांमध्ये आपला प्रभाव निर्माण केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने एका अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून तिच्या कानात मंत्र सांगितल्याचा प्रकार केला. त्यानंतर अडचण किंवा संकट आल्यास आपल्याशी संपर्क साधण्यास सांगत तिच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर संबंधित मुलीचे तज्ज्ञांकडून समुपदेशन सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची कुणकुण लागताच आरोपीने परिसरातून पळ काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले असून, त्याच्या संभाव्य ठिकाणांची माहिती घेतली जात आहे.






