लोणी काळभोर, ता. 22 : म्हैस कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई सुरू असताना झालेल्या वादाचा राग मनात धरून एका विवाहित महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार लोणी काळभोर येथे घडला आहे. याप्रकरणी गोरक्षक ऋषी कामठे (रा. रामटेकडी, हडपसर) याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला या एका फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून गोसेवेचे व गोरक्षणाचे काम करतात. 9 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मित्र गोरक्षक ईश्वर कट्टे यांना म्हैस कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनाबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित वाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणून त्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली होती.
दरम्यान, याच कारवाईच्या अनुषंगाने ऋषी कामठे पोलीस ठाण्यात आला आणि फिर्यादी महिलेशी वाद घालू लागला. त्यावेळी महिलेने त्याला बाहेर जाऊन बोलू, असे सांगितले. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. कारवाईसंदर्भातील गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणण्याकरिता महिला घरी गेल्या होत्या.त्यानंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथील एचडीएफसी बँकेसमोर, दत्त मंदिराशेजारी ऋषी कामठे हा त्याच्या साथीदारांसह महिलेसमोर आला. त्याने महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत, ‘तुझा आवाज खूप वाढायला लागला आहे. पुढील चार दिवसांत तुझा गेम करतो,’ अशी धमकी दिली. तसेच, ‘तुझे कपडे काढून तुला इथेच नग्न करतो, तुला कोण वाचवायला येते तेच पाहतो,’ असे म्हणत तिच्या अंगावर धावून जाऊन जवळीक करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे महिला प्रचंड घाबरल्या होत्या. त्यामुळे त्यांनी तत्काळ तक्रार न देता कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार ऋषी कामठे याच्याविरोधात विनयभंग व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत ऋषी कामठे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.






