पुणे (खेड): उन्हाळ्याची चाहूल (Khed News) लागताच विहिरीवर पोहायला जाण्याचा आनंद एका कुटुंबासाठी कधीही भरून न निघणाऱ्या दु:खात बदलला आहे. खेड तालुक्यातील घोटवडी परिसरात वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षीय कैवल्य भोते या चिमुरड्याचा विहिरीत बुडून करुण अंत झाला. तब्बल 24 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

वाशेरे भोतेवाडी येथील रहिवासी असलेला कैवल्य एकनाथ भोते रविवारी दुपारी वडील आणि भावासोबत घोटवडी येथील एका विहिरीवर गेला होता. जलजीवन मिशन अंतर्गत ही विहीर नुकतीच खोदण्यात आली होती. कैवल्य पाण्यात उतरला, पण दुर्दैवाने त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. विहीर सुमारे 40 ते 50 फूट खोल होती. अचानक तो दिसेनासा झाला आणि क्षणार्धात सर्वत्र शांतता पसरली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी धाव घेतली, मात्र विहिरीची खोली आणि तळाला असलेला गाळ यामुळे कोणालाही धाडस होत नव्हते. रविवारी दुपारपासून सोमवारी सकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती, पण कैवल्यचा पत्ता लागत नव्हता. अखेर ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था’ आणि लोणावळ्यातील ‘शिवदुर्ग मित्र’ या अनुभवी पथकांना बोलावण्यात आले, ज्या मुलाचा शोध 24 तासांपासून लागत नव्हता, त्याचा मृतदेह अवघ्या 10 मिनिटांत शोधून बाहेर काढला.







