पुणे : सण आणि उत्सवांच्या काळात डीजे, लाऊडस्पीकर तसेच मोठ्या आवाजातील संगीतामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुण्यातील पेठांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी उपस्थित केला. सण साजरे करण्याच्या नावाखाली सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये ‘आवाज शांततेचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बापट यांनी उत्सवातील वाढत्या आवाजाच्या समस्येवर आपली भूमिका मांडली.

सार्वजनिक ठिकाणी सण-उत्सव साजरे करताना मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवण्यास प्रशासनाने परवानगी देताना नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा विचार करावा, असे बापट यांनी सांगितले. ध्वनीप्रदूषणामुळे काही नागरिकांना उत्सवाच्या काळात घरात राहणेही कठीण होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

नदीपात्रातील अतिक्रमण, पादचारी मार्गांची स्थिती, खराब रस्ते आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या प्रश्नांवर नागरिकांनी सक्रियपणे भूमिका मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.






