आदित्य बोराटे –

Indapur : इंदापूर – बारामती पालखी महामार्गावर तरंगवाडी हद्दीतील वेताळ मंदिरासमोर झालेल्या अपघातात 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर बुधवारी (दि. 4 मार्च) सकाळी साडेनऊ ते पावणे अकरा या वेळेत स्थानिक नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
संदीपकुमार इंदल राम (वय 23, मूळ रा. श्रीपुर नवादा, राजेपूर खादा, पूर्वी चंपारण, बिहार; सध्या रा. सोनाई डेरी जवळ, निमगाव केतकी, ता. इंदापूर) हे मंगळवारी (दि. 4 मार्च) रात्री सुमारे आठ वाजता दुचाकीवरून प्रवास करत असताना वेताळ मंदिरासमोरील अपूर्ण रस्त्यावर अपघातग्रस्त झाले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. याच ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले असून निष्पाप नागरिकांचा बळी गेला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
आंदोलनादरम्यान महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व निवेदन स्वीकारले. संबंधित विभाग, ठेकेदार आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक गुरुवारी तहसील कार्यालयात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी अजिंक्य जावीर, ॲड. सचिन राऊत तसेच सरस्वतीनगर, तरंगवाडी, गोखळी आदी भागांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे यांनी सांगितले की, वेताळ मंदिरासमोरील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून त्यामुळेच वारंवार अपघात होत आहेत. आतापर्यंत 25 हून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे यांनीही प्रशासनावर टीका करत सांगितले की, तरंगवाडी ते इंदापूरदरम्यान सर्विस रस्ता नसल्याने धोका वाढला आहे. अवजड वाहनांची वर्दळ, औद्योगिक क्षेत्रातील टँकर वाहतूक आणि शैक्षणिक संस्थांमुळे वाढलेली रहदारी लक्षात घेता तातडीने रस्त्याची कामे पूर्ण करावीत, अन्यथा व्यापक आंदोलन उभारले जाईल.
दरम्यान, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्गावरील अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करून भविष्यातील अपघात टाळावेत, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.






