राहुलकुमार अवचट

यवत, ता. 31 : अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग (Yavat News) करून ‘तुझे खानदान संपवून टाकीन’ म्हणत नातेवाईकांनाही जीवे (Pune Crime) मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 5 जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Marathi News)
पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार मुख्य आरोपी अविनाश बाळू लकडे (ता. यवत, ता. दौंड) याच्यासह इतर चार जणांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2025 ते 30 मार्च 2026 या कालावधीत आरोपी अविनाश बाळू लकडे (रा. यवत) याने फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिचा वारंवार पाठलाग केला. आरोपीने तिला गाठून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तिचा हात धरून तिला अंगावर ओढून घेतले आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. एवढेच नव्हे तर, स्वतःच्या मोबाईलमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार मानसिक त्रास दिला.
या गंभीर प्रकरणात एका महिला आरोपीचाही समावेश असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. “तू अविनाशबरोबर बोलत जा, नाहीतर तो खूप डेंजर आहे,” असे म्हणून संबंधित महिलेने पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आरोपींच्या या सततच्या त्रासामुळे पीडित मुलगी प्रचंड दहशतीखाली होती.
पीडितेने घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर, सर्वजण आरोपींना विचारणा करण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपींनी सुधारण्याऐवजी पीडितेसह तिच्या नातेवाईकांना आणि साक्षीदारांना अश्लील शिवीगाळ केली. “तुझे खानदान संपवून टाकीन,” अशी धमकी देत आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी यवत पोलिसांनी मुख्य आरोपी अविनाश लकडे आणि इतर चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मेतलवाड करीत आहेत.







