पुणे: पुणे जिल्ह्यातील मंचर येथील ऐतिहासिक बारव आणि दर्ग्याच्या जागेवरून सध्या निर्माण झालेला वाद अधिक तीव्र झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी बकरी ईद सणाचा विचार करता, परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे ग्रामीण पोलीस आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बारवच्या मुख्य भागात जाण्यास नागरिकांना तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

या वादाची सुरुवात जेव्हा खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह या ठिकाणी जात आरती केली. ही बारव पांडवकालीन असल्याच्या ऐतिहासिक नोंदी असल्याचा दावा हिंदू संघटना करत आहेत. तसेच येथील दर्गा बेकायदेशीर असून तो तात्काळ हटवण्यात यावा आणि ही जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यातून काढून घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. सध्या या जागेवर वक्फ बोर्डाचा ताबा असून, मुस्लिम संघटनांना आगामी बकरी ईद निमित्त येथे नमाज पठण करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या नमाज पठणाला हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र विरोध आहे.
आपल्या मागण्यांसाठी हिंदू संघटनांनी आता ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढण्याचे नियोजन केले आहे. या नियोजित मोर्चामध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप देखील सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मोर्चामुळे मंचर शहरात धार्मिक आणि सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंचरमध्ये अशा प्रकारचा वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील येथील एका मशिदीच्या खाली तळघर किंवा भुयार सापडल्याचा दावा करण्यात आला होता, ज्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती आणि काही काळ तणाव निर्माण झाला होता. तो वाद नंतर शांत झाला असला, तरी आता या पांडवकालीन बारवच्या मुद्द्यावरून वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. पोलीस प्रशासन सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.







