सासवड : सासवड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करत गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई 7 ऑक्टोबर 2026 रोजी सासवड परिसरात करण्यात आली. आरोपीकडून पिस्टल, मॅगझीन आणि मोटारसायकल असा एकूण सुमारे 96 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष घोळवे आणि गुन्हे शोध पथक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी सैनिक कॅन्टीनच्या मागील बाजूस एक व्यक्ती काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलसह संशयास्पद स्थितीत बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक शंकर राऊत यांच्या पथकाने तातडीने संबंधित ठिकाणी धाव घेतली.

पोलिसांनी संशयित व्यक्तीची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने आपली ओळख सांगितली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव रोहित राजू माने, (वय 24 वर्षे, रा. गुजरवाडी, दत्तनगर, निंबाळकरवस्ती, कात्रज, पुणे) असे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोटारसायकलची तपासणी केली. मोटारसायकलच्या स्टोरेज बॉक्समध्ये एक गावठी पिस्टल आणि मॅगझीन आढळून आले. पोलिसांनी दोन्ही वस्तू जप्त करून आरोपीला अटक केली.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे 50 हजारांचे गावठी पिस्टल, 1 हजारांचे मॅगझीन आणि 45 हजारांची स्प्लेंडर मोटारसायकल आहे. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध लोणीकंद, कोंढवा, खडक आणि वाघोली पोलिस ठाण्यांत यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दरोडा, चोरी आणि शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सासवड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे, पोलीस हवालदार दत्तात्रय काळे, पोलीस हवालदार जाधव, पोलीस नाईक गोकुळ हिप्परकर, पोलीस कॉन्स्टेबल तुषार लोंढे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रविण शेंडे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.






