सासवड, ता. 1: उदाचीवाडी (ता. पुरंदर) येथे गायरानामध्ये बकरी चारण्यावरून झालेल्या वादातून मेंढपाळाला दगड फेकून मारल्याची तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धू गुलाब मदने (वय 27, व्यवसाय मेंढपाळ, सध्या रा. उदाचीवाडी, मूळ रा. मुर्टी, ता. बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण विठ्ठल कुंभारकर, राहुल दत्तात्रय कुंभारकर, सुनील निवृत्ती पवार आणि अनिकेत प्रभाकर कुंभारकर (सर्व रा. उदाचीवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मदने हे आपल्या कुटुंबीयांसह गेल्या दोन दिवसांपासून उदाचीवाडी येथे बकरी चारण्यासाठी आले होते. त्यांनी वीटभट्टीजवळ पाल ठोकून मुक्काम केला होता. 29 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास मदने, त्यांची पत्नी, मेव्हणा आणि चुलत सासू बकऱ्या घेऊन बंद पडलेल्या खडीमशीनजवळील गायरानात चारण्यासाठी गेले होते.

त्यावेळी चार जण तेथे आले आणि “आमच्या रानात बकरी चारायची नाहीत, बकऱ्या येथून हटवा,” असे सांगत वाद घातल्याचा आरोप आहे. ही जमीन गायरानाची असल्याचे मदने यांनी सांगितल्यानंतर वाद वाढला. त्यातील एका व्यक्तीने दगड फेकून मदने यांच्या छातीवर मारला. त्यानंतर तिघांनी शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मदने यांच्या पत्नी व नातेवाईकांनी मध्यस्थी करून त्यांना सोडविले. घटनेनंतर मदने यांच्या पत्नीने डायल 112 वर संपर्क साधला. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर तक्रार देण्यास सांगितले. मात्र, सायंकाळ झाल्याने मदने कुटुंबीयांसह मुक्कामाच्या ठिकाणी परतले.
दरम्यान, बकऱ्यांची मोजणी केली असता चार ते पाच बकऱ्या कमी असल्याचे आढळले. या बकऱ्या संबंधित व्यक्तींनी नेल्या असाव्यात, असा संशयही फिर्यादीने व्यक्त केला आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.






