पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आंदोलनाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. डॉक्टरांचे पथक वैद्यकीय तपासणीसाठी उपोषणस्थळी दाखल झाले होते, मात्र जरांगे यांनी तपासणी करून घेण्यास ठाम नकार दिला. त्यांची बिघडती प्रकृती पाहता राज्य सरकारमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आंदोलनावर आणि मागण्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात एक विशेष शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीला रवाना होणार आहे. या शिष्टमंडळात उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांचा समावेश असणार आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र पाठिंबा मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथे लक्ष्मण कदम आणि ओमप्रकाश कदम या मराठा सेवकांनी तब्बल 100 फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढून आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलकांनी मराठा आरक्षणासोबतच राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी देखील लावून धरली आहे.

दरम्यान, जात पडताळणी समितीकडून कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने वैजापूर येथील सृष्टी सोनवणे या विद्यार्थिनीने जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. राजकीय दबावामुळे प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या प्रमाणपत्रामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारी 3 लाख रुपयांची फी भरावी लागेल किंवा शैक्षणिक वर्ष वाया जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
कुणबी दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि सरकारच्या संथ कारभारावर मराठा समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे आणि सरकारच्या शिष्टमंडळासोबत होणाऱ्या चर्चेकडे लागले आहे.






