संतोष पवार

इंदापूर: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव हे उजनी बॅकवॉटर मधील एक नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आणि तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेले गाव आहे. इंदापूर शहर केवळ ९ किमी अंतरावर असले तरी कुगाववासीयांना तिथे पोहोचण्यासाठी तब्बल १०० किमीचा वळसा घालावा लागत होता. हा वळसा म्हणजे केवळ अंतर नव्हते; तो होता शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ, शेतीचे व्यवहार आणि संधींमधील अडसर. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणजे फक्त एकच कुगाव ते इंदापूर जोडपूल.
कुगावच्या सरपंच पदावर कार्यरत असताना सौ तेजस्विनी दयानंद कोकरे यांनी कुगाव पंचक्रोशीला इंदापूर जोडपुलाचे स्वप्न दाखवून शासन दरबारी मागणी करून अधिकृत शासकीय पाठपुराव्यास सुरुवात केली अन् विविध पातळ्यांवर धावपळ चालू केली. महाराष्ट्राचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इंदापूरचे आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व राज्याचे कृषामंत्री दत्तात्रय भरणे यांनी कुगाव ते इंदापूर जोडपुलाच्या मंजुरीपासून कामाच्या सुरुवातीपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेला निर्णायक गती दिली.
अजितदादांनी विधानसभेत पुलासाठी अधिकृत मंजुरी मिळवून देत तात्काळ ३९६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. शासन निर्णयानंतर त्यांनी समन्वय साधून महाराष्ट्र शासनामार्फत २३ ऑगस्ट २०२४ रोजी कामाला सुरुवात करून दिली असून सध्या या कुगाव ते इंदापूर जोडपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या कुगाव ते इंदापूर जोडपुलाचे काम सध्या वेगात सुरू आहे.कुगाव ते इंदापूर जोडपुलामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा अन् पालखी महामार्ग इंदापूर शहराला जोडला जाणार आहे.






