पुणे: पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत संतापजनक (Pune Crime) घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष अत्याचार करणाऱ्या आणि तिच्या मावशीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ऋतिक रावसाहेब लोणके (वय २६, रा. सोमनाथनगर, खराडी रोड) असे आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी अवघ्या १६ वर्षांची आहे. आरोपी ऋतिकने “माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि आपण लग्न करणार आहोत,” असे खोटे आश्वासन देऊन या मुलीला आपल्या जाळ्यात ओढले होते.
हा निंदनीय प्रकार ११ डिसेंबर २०२४ पासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत सतत सुरू होता. आरोपी ऋतिकने या अल्पवयीन मुलीची इच्छा नसतानाही तिच्यावर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाचे आमिष दाखवून तो या मुलीचे लैंगिक शोषण करत होता.
जेव्हा पीडित मुलीच्या मावशीला या प्रकाराचा संशय आला, तेव्हा त्यांनी ऋतिकला मुलीशी बोलण्यास सक्त मनाई केली. मात्र, सुधारण्याऐवजी आरोपीने क्रूरतेची सीमा ओलांडली. “जर मला तिच्याशी बोलू दिले नाही, तर माझ्याकडे असलेले तिचे न्युड (अश्लील) फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करेन,” अशी धमकी त्याने मुलीच्या मावशीला दिली. या धमकीमुळे पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली होते.
अखेर या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी ऋतिक लोणके विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक धुर्वे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







