पुणे: नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात (Black Magic On Ajit Pawar) प्रकरणाचा तपास एका बाजूला वेगाने सुरू असतानाच या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळू लागले आहे. बलात्काराच्या आरोपांबरोबरच अंधश्रद्धा (Ashok Kharat) आणि जादूटोण्याच्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून (Ajit Pawar Death) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी या संदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. (Latest Marathi News)

सुनील माने यांनी दावा केला की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती आणि मुंबईतील देवगिरी या निवासस्थानाबाहेर काही संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. या वस्तू जादूटोणा करण्यासाठी वापरल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या घटनेचा आणि कॅप्टन अशोक खरात यांचा काही संबंध आहे का, याची चौकशी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माने यांच्या मते, अजित पवार यांच्यावर जादूटोणा किंवा काळी जादू करण्याचा प्रयत्न झाला होता का, याचीही तपास यंत्रणांनी खातरजमा करावी. या प्रकरणात खरात आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा काही संबंध आहे का, याबाबत अनेक शंका उपस्थित होत असून त्यावर स्पष्टता येणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेल्या चौकशीत या सर्व बाबींचा समावेश करून तपास अधिक व्यापक करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गतही कारवाई व्हावी, असेही माने यांनी स्पष्ट केले. आधीच महिला अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या या प्रकरणात जर जादूटोणा आणि अंधश्रद्धेशी संबंधित बाबींचीही भर पडली, तर हा मुद्दा आणखी संवेदनशील ठरण्याची शक्यता आहे.
एकूणच, कॅप्टन खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारी चौकशीपुरते मर्यादित न राहता सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय पातळीवर चर्चेचा विषय बनले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत तपासातून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






