सागर जगदाळे

भिगवण (प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातील भिगवण (Bhigwan News) आणि तक्रारवाडी परिसरात उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील पाण्यालगत बसवलेल्या मोटार पंपांच्या केबल चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. एकाच रात्री तब्बल १४ शेतकऱ्यांच्या कॉपर केबल्स चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तक्रारदार ऋतिक विकास वाघ (वय २६, रा. तक्रारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी धरणाच्या पात्रात बसवलेल्या मोटार पंपाची सुमारे २०० फूट लांबीची कॉपर केबल चोरीला गेली आहे. १९ मार्च २०२६ च्या रात्री ११ वाजेपर्यंत ही केबल सुरक्षित होती, मात्र २० मार्च रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.
ऋतिक वाघ यांनी परिसरात शोध घेतला असता, त्यांच्यासह आसपासच्या इतर १३ शेतकऱ्यांच्याही केबल्स चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये भोलाराम शेलार, अमर घुमाळ, प्रवीण गुरव, गणेश चव्हाण, राजेंद्र चव्हाण, गोविंद चव्हाण, संजय भरणे, राजेंद्र घोलप, विक्रम शेलार, सुभाष कांबळे, अनिल वाघ, अविनाश वाघ आणि पोपट वाघ या शेतकऱ्यांचा समावेश आहे.
चोरट्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक हा प्रकार केल्याचा संशय आहे. प्रत्येक शेतकऱ्याची सुमारे २०० फूट लांबीची कॉपर केबल, ज्याची अंदाजे किंमत ८,००० रुपये आहे, अशी एकूण सुमारे १ लाख १२ हजार रुपयांहून अधिक किमतीची वायर चोरीला गेली आहे प्राथमिक अंदाजानुसार २४,००० रुपयांची नोंद असली तरी एकूण १४ शेतकऱ्यांचे नुकसान मोठे आहे. कॉपरला बाजारपेठेत मिळणाऱ्या वाढत्या किमतीमुळे ही चोरी झाल्याची चर्चा आहे.
आधीच अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, त्यातच बाजारभावाअभावी शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. आता केबल चोरीमुळे ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा खंडित झाल्याने शेतीकामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.







