पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये परवडणाऱ्या दरात घर मिळवण्याची संधी शोधणाऱ्या नागरिकांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. म्हाडाच्या 4,462 घरांसाठी आतापर्यंत 1 लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असूनही ऑनलाइन पडताळणी पूर्ण होत नसल्याने अनेक अर्जदार अडचणीत सापडले आहेत.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळाने या घरांसाठी 26 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. सुरुवातीला अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. रहिवासी दाखला, आयकर विवरणपत्र (ITR) आणि उत्पन्नाचा दाखला मिळवणे तसेच त्यांची ऑनलाइन पडताळणी करताना अडचणी येत असल्याने अर्जाची मुदत वाढवून 15 ऑक्टोबर करण्यात आली. मात्र, मुदतवाढीनंतरही अर्जदारांच्या समस्या पूर्णपणे सुटलेल्या नाहीत.

काही अर्जदारांकडे रहिवासी प्रमाणपत्र, आयटीआर आणि तहसीलदारांनी दिलेले उत्पन्नाचे दाखले आहेत. तरीही या कागदपत्रांवरील बारकोडची ऑनलाइन पडताळणी होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. परिणामी, अर्ज भरूनही पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत.

ऑनलाइन अर्ज करताना वारंवार अडचणी येत असल्याने अनेक नागरिकांनी म्हाडाच्या कार्यालयात जाऊन तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली आहे. अर्जदारांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या मदतीने अडथळे दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रश्न म्हाडाच्या संकेतस्थळाशी संबंधित नसून महाआयटीच्या संगणक प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित विभागाला कळवण्यात आले असून, तांत्रिक अडचण लवकर दूर होईल, असे सांगण्यात आले आहे.






