लोणी काळभोर, ता. 21: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने चाललेल्या कारणे रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात गुरुवारी (ता.19) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. तर चालकाच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेखा प्रकाश दवे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अभिषेक महादेव कांबळे (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सुलोचना प्रकाश दवे (वय 23, रा. विमल निवास, लोणी स्टेशनजवळ, कदमवाकवस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दवे कुटुंबाचे लोणी स्टेशन परिसरात पूजा साहित्याचे दुकान आहे. सुलोचना दवे व त्यांची आई रेखा दवे या दोघी नवीन कपडे खरेदी करण्यासाठी कदमवाकवस्ती येथील लोणी स्टेशन परिसरात आल्या होत्या. त्यावेळी त्या पुणे–सोलापूर महामार्ग पायी ओलांडत असताना हडपसरकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या किया कंपनीच्या कारने रेखा दवे यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की त्या रस्त्यावर कोसळून बेशुद्ध झाल्या.
अपघातानंतर परिसरातील नागरिक तातडीने मदतीला धावले. त्यांनी जखमी रेखा दवे यांना रस्त्याच्या बाजूला हलवून संबंधित कारही थांबवली. नागरिकांच्या मदतीने जखमी रेखा दवे यांना तातडीने रिक्षातून विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या डाव्या मांडीला दुखापत झाली असून पोट, छाती व चेहऱ्यावर खरचटले आहे. याप्रकरणी सुलोचना दवे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चालक अभिषेक महादेव कांबळे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 281, 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 119, 177 व 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







