पुणे: पुण्यातील गुलटेकडी परिसरात बीडमधील राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू तुकाराम गंगाधर करांडेने (वय 28) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम हा मूळचा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खडकी देवळा गावचा रहिवासी होता. त्याने राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केले होते.

गेल्या काही दिवसांपासून तुकाराम पुण्यात मित्रांसोबत राहत होता. घटनेच्या वेळी त्याचे मित्र काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. ते परतल्यानंतर तुकारामने गळफास घेतल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान, तुकारामवर सुमारे 15 दिवसांपूर्वी बीड पोलिसांनी कारवाई केली होती. बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याच्या आरोपावरून स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्यावर कारवाई केल्याची माहिती आहे. या प्रकरणात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या कारवाईनंतर तुकाराम मानसिक तणावात असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता का, याबाबतही तपास केला जात आहे. मात्र, त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. तुकारामच्या निधनामुळे राष्ट्रीय पातळीवर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने क्रीडा क्षेत्रातही दुःखाचे वातावरण आहे.






