नाशिक : आजार दूर करण्यासाठी पूजा करण्याचे आणि दैवी शक्तींच्या मदतीने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका महिलेची 7.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल येथील एका महिलेला अस्थमाचा त्रास होता. नाशिकच्या गंगापूर परिसरात राहणाऱ्या अरुण पाटील याच्याकडे दैवी शक्ती असल्याची माहिती तिला मिळाली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने महिलेला आणि तिच्या पतीला पनवेलहून नाशिकला आणण्याची व्यवस्था केली. प्रवासादरम्यान त्यांच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधण्यात आल्याचा आरोप आहे. पूजा केल्यानंतर आजारात सुधारणा झाल्याचा भास निर्माण झाल्याने महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला.

यानंतर पैशांचा पाऊस पाडून देण्याचे आश्वासन देत आरोपीने महिलेकडून मासिक पाळीच्या रक्ताने माखलेले कपडे आणण्यास सांगितल्याचा आरोप आहे. पुढील पूजाविधीत महिलेला अर्धनग्न अवस्थेत बसवून विविध वस्तूंचा वापर करण्यात आला. या विधीसाठी मानवी कवटी, तांदूळ, हळद, कुंकू आणि इतर साहित्य वापरल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.

आरोपीने वेगवेगळ्या पूजाविधींच्या नावाखाली महिलेकडून एकूण 7.5 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र, अपेक्षित परिणाम न झाल्याने महिलेने पैसे परत मागितले. त्यावेळी समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात येते.
या प्रकरणाची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. त्यानंतर गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, अशा प्रकारे फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी पुढे येऊन गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.






