लोणी काळभोर, ता. 14 : पूर्व हवेलीतील आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, कोलवडी, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा, कोरेगाव मूळ, लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि कदमवाकवस्ती गावांमधील रस्ते दुरुस्ती, बंदिस्त गटारे, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, पाणीपुरवठा, समाजमंदिर, सभामंडप तसेच विविध पायाभूत सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे.‘हवेली तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, हे पंचायत समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शिरुर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावांत विकासगंगा पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ असे प्रतिपादन हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी केले आहे

हवेली पंचायत समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या तब्बल 5 कोटी 46 लाख 28 हजार रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ रविवारी (ता. 13) आमदार ज्ञानेश्वर ‘माऊली’ कटके व आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते उत्साहात झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शितल कांबळे, पंचायत समितीचे सदस्य कृषीराज चौधरी, सुदर्शन चौधरी, अमोल टेकाळे, सुषमा मुरकुटे, कोमल कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, भाजप जिल्हाध्यक्षा पुनम चौधरी, सहायक गटविकास अधिकारी शिवाजी नागवे, उपअभियंता निरंजन जाधव, यशवंतचे संचालक किशोर उंद्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सुरेश कुंजीर, संग्राम कोतवाल, उरुळी कांचनचे माजी सरपंच मयुर कांचन, भाऊसाहेब कांचन, सागर कांचन, माजी उपसभापती हेमलता बडेकर, प्रतिक काळभोर, सुशील काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना काकडे म्हणाले कि, ‘टप्पा-२’च्या माध्यमातून आणखी काही विकासकामांना मंजुरी देण्यात येणार असून, हवेली तालुक्यातील प्रलंबित कामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल. गावागावातील मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंचायत समिती प्रयत्नशील आहे,’ असे सभापती युवराज काकडे यांनी सांगितले.

या विविध विकासकामांचा शुभारंभ थेऊर येथे करण्यात आला. यामध्ये स्वच्छता विषयक कामे, समाजमंदिर सुधारणा, भिलवस्ती येथील सभामंडप व समाजमंदिर, थेऊर-नायगाव शिवरस्ता दुरुस्ती, भीमनगर-इंदिरानगर अंतर्गत रस्ता, सांडपाणी व्यवस्थापन तसेच थेऊर रोड-राजबाग रस्ता व एमआयटी कॉलेज ते लोणी स्टेशन या मार्गाच्या सुधारणा कामांचा समावेश आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी 70 लाख 80 हजार रुपये, तर विविध रस्त्यांच्या सुधारणांसाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे थेऊर परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कुंजीरवाडी येथे स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि बाजारतळ परिसराच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू करण्यात आली. यामध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी 53 लाख 49 हजार रुपये, बाजारतळ परिसर काँक्रीटीकरणासाठी 10 लाख 85 हजार रुपये, तसेच स्वच्छता विषयक कामांसाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आळंदी म्हातोबा येथे पायाभूत सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन आणि शिवरस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. आव्हाळवाडी येथे नळ पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, मांजरी खुर्द येथे पायाभूत सुविधा आणि कोलवडी येथे गटारलाईनच्या कामांना सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, लोणी काळभोर येथे पायाभूत सुविधा आणि स्वच्छता विषयक कामे, तर उरुळी कांचन येथे बंदिस्त गटार व स्वच्छता विषयक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कदमवाकवस्ती येथे गावांतर्गत बंदिस्त गटर व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. कोरेगाव मूळ येथेही पायाभूत सुविधांच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
पालखीतळाच्या विकासासाठी 2 कोटी 15 लाख
कदमवाकवस्ती येथील पालखीतळ परिसराच्या विकासासाठी तब्बल 2 कोटी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोलापूर रोड-पांडवदंड रस्ता ते पालखीतळ जोडरस्ता सुधारण्यासाठी 1 कोटी 81लाख रुपये, पालखीतळ ते ओढ्यापर्यंत रस्त्यासाठी २४ लाख रुपये आणि पालखीतळ सुधारणेसाठी 10 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामांमुळे पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच वर्षभर भाविक व नागरिकांना या परिसरात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.






