लोणी काळभोर, ता. 14: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ सहज मिळावा, यासाठी कदमवाकवस्तीच्या सदस्य रुपाली काळभोर आणि राष्ट्रीय हॉकी खेळाडू सतीश काळभोर यांच्या वतीने एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढून देण्याचे विशेष दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोणी स्टेशन (ता. हवेली) येथील हनुमान मंदिरात शनिवारी (ता. 12) आणि रविवारी (ता. 13) झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

एनसीएमसी स्मार्ट कार्ड शिबिराचे उद्घाटन कदमवाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड व महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे, माजी सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच नसीरदादा पठाण, दत्तात्रय काळभोर, रुपाली काळभोर, स्मिता लोंढे, समीर खान, राष्ट्रीय हॉकी खेळाडू सतीश काळभोर, मयूर कदम, रमेश कोतवाल, उदय काळभोर, अभिजीत बडदे, अविनाश बडदे, प्रतीक काळभोर, ऋषिकेश काळभोर, शशिकांत काळभोर, विकास कदम, किरण काळभोर, मयूर काळभोर, दत्ता अंबुरे, अनिल शिंदे ,कल्याण पवार, गणेश काळभोर, सुहास काळभोर, विजय सकट, दीपक काळभोर, समीर सय्यद आदी उपस्थित होते.

महिला व ज्येष्ठ नागरिकांनी अवघ्या 250 रुपये शुल्कात स्मार्ट कार्ड काढून घेत एसटीच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली. दोन दिवसांत 150 हून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. ग्रामीण भागातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सवलतीसाठी स्मार्ट कार्ड काढताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक पातळीवरच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्याबरोबरच स्मार्ट कार्ड काढण्याची प्रक्रिया सुलभ झाली.

दरम्यान, या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही नागरिकांच्या गरजेनुसार अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कदमवाकवस्तीच्या सदस्य रुपाली काळभोर आणि राष्ट्रीय हॉकी खेळाडू सतीश काळभोर यांच्या या शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे.







