मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) FIR दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

CBI च्या FIR मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेता डिनो मोरिया आणि सूरज पंचोली यांच्या नावांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. याशिवाय रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि काही इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मालवणी परिसरातील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला या घटनेकडे अपघात किंवा आत्महत्या म्हणून पाहिले गेले. मात्र, नंतर तिच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर तिच्या वडिलांनी चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर प्रकरणाच्या तपासासाठी CBI चौकशीचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.

या प्रकरणात सरकारी यंत्रणा आणि पोलिसांचा गैरवापर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह काही राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या हाय-प्रोफाइल प्रकरणाच्या तपासासाठी CBI दिल्ली मुख्यालयातील विशेष पोलीस उपअधीक्षक पुराण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तपास पुढे जाणार असून, संबंधित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत अधिक माहिती तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे.






