हडपसर, ता. 7 : ‘तुमच्या मोबाईल क्रमांकाचा वापर 22 कोटींच्या मनी लाँड्रिंगसाठी झाला असून, तुम्हाला 22 लाख रुपये कमिशन मिळाले आहे’, अशी भीती दाखवत सायबर भामट्यांनी हडपसरमधील 75 वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचा धाक दाखवून तब्बल 8 लाख 42 रुपयांची फसवणूक केली. ‘एटीएस, दिल्ली’मधील तपास अधिकारी असल्याचे सांगून आरोपींनी व्हॉट्सॲपवरून वारंवार व्हिडीओ कॉल करत वृद्धाला मानसिक दबावाखाली ठेवले.

दिलीप वामनराव हत्तेकर हे हडपसर परिसरात पत्नीसमवेत राहतात. 7 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल आला. समोरील व्यक्तीने स्वतःचे नाव ‘श्रीवास्तव’ सांगून आपण दिल्ली एटीएस विभागातील तपास अधिकारी असल्याचे भासवले. त्यानंतर हत्तेकर यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप करत ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगण्यात आले.

यानंतर आरोपींनी सलग व्हिडीओ कॉल करून कुटुंबाची माहिती घेतली आणि या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी 8 लाख रुपये देण्याची मागणी केली. आरोपींनी दिलेल्या तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 9 ते 16 सप्टेंबरदरम्यान हत्तेकर यांनी एकूण 8,00,042 रुपये पाठवले. पैसे मिळाल्यानंतरही आरोपींकडून आणखी पैशांची मागणी सुरूच होती.

4 ऑक्टोबर रोजी आरोपींनी हत्तेकर यांच्या मुलीशीही संपर्क साधून तिच्या वडिलांनी 22 कोटींची मनी लाँड्रिंग केल्याचे सांगितले आणि आणखी पैसे पाठवण्यास सांगितले. संशय आल्याने मुलीने वडिलांकडे धाव घेत 1930 हेल्पलाइनवर सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांक आणि बँक खात्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.






