वृंदावन : संत प्रेमानंद महाराज यांचे शिष्य रसिक दुलारी शरण यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. 25 सप्टेंबर रोजी चौथ्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर समोर आलेल्या CCTV फुटेज आणि शवविच्छेदन अहवालामुळे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. रसिक दुलारी शरण हे मूळचे जबलपूरचे रहिवासी होते.

घटनेच्या काही वेळ आधी ते आश्रमातील आपल्या खोलीतून बाहेर पडल्याचे CCTV मध्ये दिसत आहे. त्यानंतर ते पायऱ्यांमार्गे इमारतीच्या छतावर गेल्याचे फुटेजमध्ये आढळले. छतावर पोहोचल्यानंतर ते काही वेळ संरक्षक भिंतीजवळ बसले आणि नंतर तेथे झोपल्याचेही दिसते. काही वेळाने ते अचानक उठले आणि चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मृत्यूपूर्वी त्यांच्या शरीरावर गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे डॉक्टर आणि तपास यंत्रणांसमोरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इलेक्ट्रिक ग्राइंडरने स्वतःचे गुप्तांग चिरले एवढी गंभीर दुखापत होऊनही त्यांच्या हालचाली CCTV मध्ये तुलनेने सामान्य दिसत असल्याने पोलिसांना त्यांच्या मानसिक किंवा शारीरिक अवस्थेबाबत संशय आहे.

रसिक दुलारी शरण यांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या मृत्यूपूर्वी कोणत्याही अमली पदार्थाचा किंवा नशेचे सेवन त्यांनी केली होती का, याची तपासणी केली जात आहे. तसेच CCTV फुटेजमध्ये काही छेडछाड झाली आहे का, याचाही फॉरेन्सिक तपास सुरू आहे.
शवविच्छेदन अहवालानुसार, त्यांच्या शरीरावर एकूण 7 गंभीर दुखापती आढळल्या. चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे डोके, चेहरा, हात, पाय आणि टाचांना मोठ्या प्रमाणात इजा झाली होती. डॉक्टरांच्या प्राथमिक निष्कर्षानुसार, इलेक्ट्रिक ग्राइंडरने स्वतःचे गुप्तांग चिरले म्हणून गंभीर रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरु आहे.






