पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग श्री महालक्ष्मी मंदिरात यंदाचा सार्वजनिक नवरात्रौत्सव 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यावर्षीच्या उत्सवासाठी ‘शृंगार’ ही मुख्य संकल्पना निश्चित करण्यात आली असून, संपूर्ण मंदिर परिसर आणि मुख्य प्रवेशद्वार याच धर्तीवर सजवले जाणार आहे.

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर देवीला 2 किलो वजनाचा नक्षीदार व कलाकुसर केलेला सोन्याचा मुकुट परिधान केला जाणार आहे . तसेच विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी नेसवली जाणार आहे. उत्सवाच्या दहा दिवसांत पौरोहित मिलिंद राहूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज अभिषेक, याग आणि महाआरती असे धार्मिक विधी पार पडतील. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी भाविकांसाठी सामूहिक श्रीसूक्त पठणाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या महोत्सवात विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांचा ‘नारीशक्ती सन्मान’ पुरस्काराने गौरव केला जाईल. यामध्ये महिला शेतकरी, शास्त्रज्ञ, पोलीस अधिकारी, वैमानिक, जिल्हाधिकारी आणि उद्योजिका यांचा समावेश असेल.

उत्सवातील प्रमुख आकर्षणांमध्ये 13 ऑक्टोबरला निघणारी अष्टलक्ष्मी मिरवणूक, ललिता पंचमीला होणारे कन्यापूजन आणि ‘गाथा शिवशंभूंची’ हा जिवंत देखावा यांचा समावेश आहे. याशिवाय 19 ऑक्टोबर रोजी मंदिरासमोर भव्य सामूहिक गरबा रंगणार आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ढोल-ताशा वादन आणि माता की चौकी यांसारखे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही आयोजित केले आहेत.
दसऱ्याच्या दिवशी विश्वकर्मा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले जाईल. मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांच्या सुरक्षेसाठी 5 कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला असून, सुरक्षेसाठी 50 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 50 हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल आणि उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन सर्व पुणेकरांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.






