पुणे : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे समोर आलेल्या तब्बल 2,143 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातील सुमारे 200 कोटी रुपयांची रक्कम पुण्यातील एका नामांकित खासगी बँकेच्या माध्यमातून परदेशात पाठवल्याची माहिती आयकर विभागाच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.

बनावट कागदपत्रे, खोट्या प्रमाणपत्रांचा वापर तसेच शेल कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्याचा संशय या प्रकरणात व्यक्त केला जात आहे. मोठ्या प्रमाणावर पैसा परदेशात वळवण्यासाठी बँकेतील काही वरिष्ठ अधिकारी किंवा संबंधित व्यवस्थापनाची मदत झाली का, याचा तपास आता सुरू होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचा तपास आयकर अन्वेषण विभागाकडून केला जात आहे. उपायुक्त दीपककुमार यांच्या पथकाने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता अधिकृत तपासाचे स्वरूप मिळाले आहे.

दरम्यान, या आर्थिक व्यवहारांचे धागे पुण्याबरोबरच देशातील इतर महत्त्वाच्या शहरांपर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. बंगळुरू आणि चंदीगडमधील काही बँकिंग व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे. दिल्ली-एनसीआर परिसरातील बनावट कंपन्यांच्या खात्यांमधून झालेल्या व्यवहारांवरही यंत्रणांची नजर आहे.

या संपूर्ण प्रकरणातील मुख्य संशयित सीए श्याम कलानी याने उदगीर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यानंतर तपास यंत्रणांकडून आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात आहे.
पुण्यातील कोणत्या बँकेमार्फत पैसे परदेशात गेले, या व्यवहारांमध्ये नेमके कोण सहभागी होते आणि त्यांना कोणाची मदत मिळाली, याचा उलगडा तपासातून होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील बँकिंग क्षेत्रातही चर्चेला उधाण आले आहे.







