पुणे: वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. विशेषतः भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics)

तुषार भोसले म्हणाले, “तुम्ही जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्ट्या करता, तेव्हा तुम्हाला ते धर्मांध वाटत नाही. पण ‘राम कृष्ण हरी’ आणि ‘ज्ञानोबा तुकोबा’चा गजर करणारा वारकरी संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटतो?” अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवर थेट निशाणा साधला.
भोसले यांनी पुढे आरोप केला की, वारकरी संप्रदाय हा सामाजिक समतेचा आणि प्रबोधनाचा मार्ग आहे. मात्र, त्याला धर्मांध म्हणणे हे चुकीचे आहे. “वारकरी संप्रदायाला हिंदू धर्मापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
शरद पवार यांनी आपल्या वक्तव्यात वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीची घुसखोरी झाल्याचे म्हटले होते. तसेच सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले होते. या विधानावरून राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येत असून, वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.







