पुणे: लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर दीर्घकाळ लैंगिक (Pune Shocking News) अत्याचार केल्याचा आणि लग्नाच्या चर्चेदरम्यान जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अक्षय संदीप बागुल (वय 33, रा. साई पार्क सोसायटी, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ परिसर) याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 33 वर्षीय तरुणीची आरोपीशी ओळख झाल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. या विश्वासावर आरोपीने 2023 पासून ऑक्टोबर 2025 पर्यंत विविध ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या काळात आरोपीने मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपीकडून वारंवार भांडणे करून शिवीगाळ करण्यात येत होती. तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या. पुढे लग्नाबाबत दोन्ही कुटुंबीयांमध्ये चर्चा सुरू असताना आरोपीने बैठकीदरम्यान जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तरीही आरोपी लग्नास तयार होईल या अपेक्षेने पीडित तरुणी काही काळ वाट पाहत होती.
मात्र अखेरीस आरोपीने लग्नास नकार दिल्याने तसेच तिचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण झाल्याची जाणीव झाल्यानंतर पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे करत आहेत. लग्नाचे आमिष दाखवून महिलांचे शोषण केल्याच्या घटना अधूनमधून समोर येत असून अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाईची मागणीही वारंवार होत आहे.







