Pune Ring Road Drone survey: शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. या रोडच्या परिसरातील 117 गावांचा नियोजनबद्ध विकास करण्याचा उद्देश ठेऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. आगामी 2 वर्षात राज्य सरकारकडे या 117 गावांचा विकास आराखडा सादर करण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे 117 गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

कोणत्या सुविधा उभारणार? (Pune Ring Road Drone survey)
या 117 गावांच्या विकासाला लवकरच गती मिळणार आहे. या गावांमध्ये शाळा, ट्रक टर्मिनल, लॉजिस्टिक पार्क, टाउनशिप आणि ट्रॉमा केअरसारख्या अत्याधुनिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. भोर, हवेली, मुळशी, पुरंदर आणि वेल्हे या तालुक्यांमधील गावांचा विकास ‘एमएसआरडी’ ला सोपवण्यात आला आहे. यासाठी सुमारे 668 चौरस.किमी क्षेत्राचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण
रिंग रोड प्रकल्पाअंतर्गत जी गावे येतात त्यांचा विकास कसा करता येईल, हे स्पष्ट करण्यासाठी व त्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी ड्रोनद्वारे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. याद्वारे सर्व गावांमधील उपलब्ध असलेल्या सुविधा, बांधकामे आणि जमीन वापर याची माहिती गोळा केली गेली आहे. गावातील मोकळ्या जागांचा वापर कसा करता येईल याचा विचार करून विकासाचे नियोजन आखले जाणार आहे.
117 गावांचा होणार सर्वांगीण विकास
पुणे रिंग रोडभोवतीच्या 117 गावांचा विकास आराखडा तयार करताना पुढील 20 वर्षांतील गरजा आणि वाढणारी लोकसंख्या यांचा विचार करण्यात आला आहे. या गावांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण, शिक्षण आणि उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे नियोजन केले जाणार आहे. तसेच, पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
पायाभूत सुविधांचे नियोजन
येणाऱ्या काळात लोकसंख्या वाढ होऊ शकते. पाण्याची कुठलीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी, विकास आराखड्यात पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी पाण्याच्या टाक्या, जलवाहिनी आणि पाणीपुरवठा यंत्रणेसाठी आवश्यक तेवढी जागा आरक्षित ठेवली जाणार आहे.
नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करण्याचे मोठे नियोजन आहे. या परिसराचा सुनियोजित आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी दोन ‘ग्रोथ सेंटर्स’ विकसित केले जाणार आहेत.
शिक्षण आणि इंडस्ट्रियल हबचे धोरण
रिंग रोडभोवतीच्या 117 गावांमध्ये विकासाला गती देण्यासाठी एज्युकेशन आणि इंडस्ट्रियल हबचे नियोजन करण्यात आले आहे. जेथे उद्योग कंपन्या आहेत, तिथे ‘इंडस्ट्रियल हब’ विकसित करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. उद्योगांसाठी लॉजिस्टिक पार्क उभारण्याचेही नियोजन आहे. यातील अनेक गावे महामार्गालगत असल्यामुळे, भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठे, शाळा आणि शिक्षणसंस्थांसाठी आवश्यक जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.







