Pune News : पुणे : पुणे-नगर महामार्गावर शिरूर तालुक्यातील सरदवाडी परिसरात एक अतिशय धक्कादायक अपघात घडला आहे. सुरक्षित जागा समजून ट्रकखाली झोपलेल्या तरुणाचा पहाटे ट्रकचालकाने चिरडल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना राजस्थान ढाब्याच्या पार्किंगमध्ये घडली. योगेश आसाराम साठे (वय 29, रा. जालना) हा तरुण रात्री ट्रकखाली झोपला होता. पहाटेच्या सुमारास ट्रकचालकाने वाहन सुरू करून पुढे घेतले. मात्र, ट्रकखाली कोणी झोपले आहे याची त्याला कल्पना नव्हती. निष्काळजीपणे ट्रक पुढे नेल्यामुळे मागील चाक योगेश यांच्या अंगावरून गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेतील गंभीर बाब म्हणजे, अपघातानंतर चालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे रस्त्याच्या कडेला किंवा वाहनाखाली झोपण्याचा धोका पुन्हा समोर आला आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास सुरू आहे.







